संजय आठवले यानी केली कंत्राटदार संतोष चांडकची पोलीस तक्रार, चांडक दंगलीस पोषक वातावरण तयार करित असल्याचा आरोप…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील छ. शिवाजी महाराज चौक ते न. प. समोरुन मच्छी बाजार चौक ते अंजनगाव मार्गावरील खाई नदीच्या पुलापर्यंतचा मार्ग हेतुपुरस्सरपणे विचित्र पद्धतीने अर्धवट बांधून नागरीकांची प्रतारणा करण्याचे तथा रहदारीवरुन वाद व्हावा आणि शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडावी असे वातावरण कंत्राटदार संतोष चांडक व त्याचा सहयोगी निर्माण करीत असल्याने चौकशी करुन त्यांचेवर पोलीस कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सरचिटणिस संजय आठवले यानी आकोट शहर ठाणेदार प्रकाश अहिरे याना केली आहे.

आकोट शहर पोलीसांना दिलेल्या तक्रारीत संजय आठवले यानी म्हटले आहे कि, संतोष लूनकरण चांडक हा शासकिय कंत्राटदार आहे. शहरातील छ. शिवाजी महाराज चौक ते पालीकेसमोरुन मच्छी बाजार चौक अंजनगाव मार्ग खाई नदीचे पूलापर्यंतच्या रस्ता बांधकामाचे कंत्राट त्याला मिळालेले आहे.

ह्या कामाचा करारनामा क्र. बी०१/४१/डीएल हा सन २०१७-१८ मध्ये झालेला आहे. तेंव्हापासून ह्या मार्गाचे काम सुरु आहे. ह्या कामासाठी ह्या मार्गाच्या दोन्ही बाजूची अनेक घरे पूर्णपणे तर अनेक घरे अर्धवट पाडण्यात आलीत. आंबोडी वेस भागातील महिलांचे सार्वजनिक शौचालयही पाडण्यात आले. जेणेकरून हे काम त्वरित होऊन नागरीकाना सुविधा व्हावी. परंतु गत चार वर्षांपासून हे काम अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे.

हा रस्ता तिन भागात विभाजित केला आहे. ह्या तिन्ही भागांचा एकमेकांशी मेळच बसविलेला नाही. ह्या तिन्ही भागांचे काठ कुठे ऊंच तर कुठे सखल ठेवण्यात आले आहेत. रस्त्यात मध्येच थिगळे लावल्याने तिथेही ऊंचसखलपणा तयार झाला आहे. गजानन महाराज मंदिर ते मच्छी बाजार चौक ह्या दरम्यानच्या ह्या मार्गाची पश्चिमेकडील बाजू फारच ऊंच झाली असुन ऊर्वरित रस्ता हा पुर्व स्थितीतच ठेवल्याने या ठिकाणी जिवघेणी अवस्था झाली आहे. अशा विचित्र बांधकामाने हा मार्ग रहदारीसाठी फारच घातक बनला आहे.

हा मार्ग अंजनगावहून पुढे मध्यप्रदेशशी जोडला गेला आहे. त्याने ह्या मार्गाने लहान सहान वाहनांसह जड वाहनेही मोठ्या प्रमाणात ये जा करतात. त्याने अनेकदा वाद उद्भवतात. अशा वादामूळे या ठिकाणी वाहने पेटवून देण्याचे प्रकारही घडलेले आहेत. लहान मोठ्या कुरबुरी तर नित्याच्याच आहेत. ह्या मार्गाच्या दोन्ही बाजूनी हिंदु, मुस्लीम, बौद्ध अशी मिश्र वस्ती आहे. त्याने हा भाग अतिसंवेदनशिल बनलेला आहे.

बांधकामाने रहदारीवरुन वाद आणि या वादाचे रुपांतर तणावात कधीही होवू शकते. त्यामूळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकते. या संदर्भात या परिसरातील नागरिकांना विचारणा केल्यास या ठिकाणी नित्य घडणाऱ्या अपघातांची व त्यावरून होणाऱ्या वादांची पूर्ण माहिती मिळू शकते.

अशा अतिसंवेदनशिल भागातील काम अति शिघ्रतेने करणे अपेक्षित असतानाही संतोष लूनकरण चांडक ह्याने गत चार वर्षांपासून हे काम रेंगाळत ठेवले आहे. आतापर्यंत केलेल्या ह्या कामाची अवस्था पाहता, चांडकने हेतुपुरस्सरपणे असे काम केल्याचे ध्यानात येते. ह्या भागात अपघात व्हावा, तो वाद चिघळावा आणि शहरात दंगल व्हावी असा चांडकचा मानस असल्याचे दिसत आहे. त्याचा हाच हेतु असल्याचे सिद्ध करणारे कारण म्हणजे त्याच्या सबबी आहेत.

ह्या कामासाठी लागणारे गौणखनिज साहित्य आकोट तालूक्यातील खाणींमधून मिळत नसल्याची सबब त्याने पुढे केली आहे. परंतु वास्तव हे आहे कि, संतोष चांडक ह्याची स्वतःची खाण व स्टोनक्रशर आहे. तेथुन त्याला गत चार वर्षात साहित्य आणून हे काम करता आले असते. आता त्याची खाण त्यानेच केलेल्या बदमाशांमूळे मा. जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी बंद केली आहे. परंतु महेंद्र तरडेजा, मदन राजदे, राजकुमार चांडक यांच्या खाणी सुरु आहेत.

तेथून संतोष चांडकला साहित्य ऊपलब्ध होऊ शकते. परंतु कामाऐवजी जातिय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे त्याचे ऊद्दीष्ट असल्याने तो असे करित नाही. त्यातच त्याने आपले हे काम अन्य कुण्यातरी कंत्राटदारास देवून आपल्या या समाजघातकी कामात एक सहयोगी मिळविला आहे.

ह्या सहयोग्याचीही शहराची खराबी व्हावी हीच मनिषा असल्याने त्यानेही हे काम बंदच ठेवले आहे. या दोघांमूळेही शहरातील जनमानसात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बाधीत होण्याची साधार भिती आहे. त्यामूळे संतोष लूनकरण चांडक व त्याचा अज्ञात सहयोगी कंत्राटदार या दोघांची सखोल चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती पोलिस कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here