न्यूज डेस्क – ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातून कार्यमुक्त झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोहम्मद सादिक शेख असे आत्महत्याग्रस्त अधिकाऱ्यांचे नाव असून त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. निवृत्त अधिकारी मोहम्मद सादिक शेख वैफल्यग्रस्त झाल्याचे बोलले जाते. दारुचे व्यसन आणि मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मोहम्मद सादिक शेख हे ठाण्याच्या कॅसल मिल परिसरातील विकास कॉम्प्लेक्समध्ये राहत होते.शेख यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही मुली विवाहित आहेत. शेख यांची एक मुलगी अभियंता असून दुसरी मुलगी डॉक्टर आहे. तर मुलगाही अभियंता आहे.
दारुचे व्यसन जडलेल्या शेख यांनी वैफल्य आणि नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. राबोडी पोलिसांनी घटनास्थळावरुन शेख यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर जप्त केले असून ते अधिक तपास करत आहेत.