अनलॉक ४ मध्ये धार्मिक,मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी…शाळा,महाविद्यालये बंदच राहणार…

न्यूज डेस्क – अनलॉक ३ चा टप्पा परवा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं आजच केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. तर शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्यात आली आहेत. परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.

गृहमंत्रालयानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक एकाच छताखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर करोनासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या इतर नियमाचं पालन करण्यात यावं, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकार चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here