पश्चिम विदर्भात सोयाबीनला विक्रमी दर…जिल्हानिहाय विक्रमी दर प्रती क्विंटल पहा…

फोटो- सौजन्य गुगल

अमोल साबळे

अकोला : यंदा सोयाबीनचे दर नवनवीन विक्रम गाठत आहे. पश्चिम विदर्भात सोयाबीनने दहा हजारांचा टप्पा गाठला होता. वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत सोयाबीनला नऊ हजारांपेक्षा जास्त दर मिळत आहे. खरीप हंगाम सुरू असताना सोयाबीनला मिळणारे हे दर पुढील काही दिवसांत आशादायी ठरणारे आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची निर्माण झालेली कमतरता, देशांतर्गत झालेले कमी उत्पादन, खाद्यतेलाला असलेली मागणी या बाबींचा परिणाम सोयाबीनच्या दरवाढीत होऊन आतापर्यंतचा उच्चांकी दर मिळत आहे. व्यापाऱ्यांकडील साठा संपला असून, बाजारात तुरळक आवक होत आहे. मागील वर्षी सोयाबीनचा हंगाम सुरू होण्याच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने या भागातील सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

सोयाबीन राशीच्या वेळी पडलेल्या पावसामुळे बाजारात डागी झालेल्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. मालात असलेला ओलावा व डागीचे प्रमाण जास्त असल्याने सोयाबीनला ३ हजार ५०० च्या आसपास भाव मिळत होता. हळूहळू दरात सुधारणा होत सोयाबीनला आता उच्चांकी दर मिळत आहे.

अकोला बाजार समितीत कमी दर

शहरातील बाजार समितीत अद्यापही सोयाबीनने नऊ हजारांचा टप्पा गाठला नाही. मंगळवारी सोयाबीनला ८ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. यावेळी केवळ ५६ क्विंटल आवक झाली.

जिल्हानिहाय दर (प्रती क्विंटल)

अमरावती ९२००

अकोला ८७००

वाशिम ९७००

यवतमाळ ९५००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here