‘मातोश्री’ वर आंदोलनसाठी निघालेले आ.रवी राणा व खा.नवनीत राणा यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात…

न्यूज डेस्क – बडनेराचे आमदार रवी राणा यांना कालच तुरुंगातून सुटका मिळाल्यानंतर मुंबईत मातोश्रीवर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मुंबई ला आंदोलनसाठी जाण्यासाठी निघालेले आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी रोखल्यामुळे युवास्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विदर्भ एक्सप्रेस अर्धा तास बडनेरा येथे रोखली होती.

तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर आंदोलनासाठी निघालेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना रात्री अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्त कार्यालयात नेलं आहे. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटू न देणं म्हणजे लोकशाहीची हत्या, असा घणाघाती आरोप राणा दाम्पत्यानं केला आहे. तर खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. रविवारी अखेर आमदार रवी राणा यांना अमरावती जिल्हा कोर्टानं जामीन मजूर केला. रवी राणा यांच्यासह अटकेतील शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.

तुरुंगातून बाहेर येताच आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं होतं. राज्य सरकारवरही त्यांनी गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत असल्याचं आमदार राणा यांनी म्हटलं आहे. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी (16 नोव्हेंबर) ‘मातोश्री’वर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here