आकाशाएवढ्या उंचीचे राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्यजी…

अहमदपूर – बालाजी तोरणे

“माझ्या सद्गुरु माऊली ची कीर्ती आहे मोठी ।
भूलोकी अवतरला महात्मा ग जग उद्धारासाठी‌ ।।

जाणे ते ब्रह्म सदा शिवाच्या साधनेत,
आचाराचे आकाश प्रज्ञेचा सुरज राष्ट्रसंत।

शिवाबाई म्हणे भक्तांचे दीपस्तंभ शिवाचार्यजी महाराज ।।”

जो जन्मतो तो मरतो हा नियतीचा नियमच आहे. ज्यांनी मानवांची सेवा करून मानवतेची व मानव धर्माची शिकवण दिली तसेच राष्ट्राची सेवा करून राष्ट्र धर्माची शिकवण दिली. समाजात प्रबोधन करून अनिष्ठ रूढी,अनिष्ठ प्रथा व अंधश्रद्धा यांना छेद देऊन नवविचार रुजवून परिवर्तन घडवले असे महामानव डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज. मरावे परी कीर्ती रुपी उरावे या उक्तीप्रमाणे कीर्तीच्या रुपाने ते अमर राहिले आहेत. ते स्वातंत्र्य सैनिक होते.

मानवतावादी व राष्ट्रवादी संत होते. विज्ञान,अध्यात्म व संस्कृती यांचा संगमच होते.त्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समता आणली तसेच सर्वधर्मसमभावाचे, मानवधर्माचे केलेले महान कार्य पाहून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब,गृहमंत्री आर.आर.पाटील साहेब व त्यांच्या मंत्रिमंडळाने मिळून विचारविनिमय करून त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन गौरविले.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्म लिंगायत धर्मियांनी शीर्षस्थानी मानून वंदनीय मानलेल्या जंगम समाजात झाला.अहमदपूर व हाडोळती येथील वीरमठ संस्थानाचे माजी मठाधीश कै.मडिवाळ आप्पा यांनी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्यांना बालपणीच भावी वारस म्हणून त्यांना विधीवत संन्यासाची दीक्षा देऊन मठाधीश बनवले. ते वीरमठ संस्थांनचे मठाधीश झाल्याने त्यांनी वीरशैव लिंगायत धर्माच्या प्रचाराची व प्रसाराची जबाबदारी आद्यकर्तव्य म्हणूनच पार पाडली.

त्याबरोबरच सर्व संतांनी मिळून संत शिरोमणी ही उपाधी दिलेल्या मन्मथ स्वामींच्या ही कार्याचा प्रचार व प्रसार केला.संत शिरोमणी मन्मथ स्वामीजींनी बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील डोंगरावर संजीवन समाधी घेतली आहे.तेथे गेल्या सहा दशकांपासून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज लाखो भक्तांना सोबत घेऊन पदयात्रा काढतात.

राष्ट्रसंताने सत्संगातून मानव धर्माची व राष्ट्र धर्माची शिकवण दिली.या महान कार्यासाठी ते जीवनभर चंदना सारखे झिजले. या थोर मानवतावादी राष्ट्रसंताच्या मनी कधीच मोह,माया निर्माणच झाली नाही. ते वैराग्यमूर्तीच होते.ते आकाशाएवढ्या आचाराचे होते तर त्यांचे ज्ञान सागराएवढे सखोल होते. त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात मुख्य अतिथी म्हणून संघाचे प्रमुख मोहनजी भागवत यांच्या सारखे दिग्गज हजर होते.

माझी जन्मदाती आई लक्ष्मीबाई बळीराम वलांडे ही होती तर दुसरी आई राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य जी सद्गुरु माऊली होते. कासविनीला पाहूनच तिच्या पिल्लांचे पोट भरते व ते तृप्त होतात अगदी तसंच राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांना पाहूनच लाखो भक्त तृप्त समाधानी होत असतं.

सन 1917 च्या 25 फेब्रुवारी रोजी इहलोकी अवतरलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य दरवर्षीप्रमाणे श्रावण मासी निरंकार म्हणजे अन्नाविना 21 दिवसाच्या अनुष्ठान करत. वीर मठात परतल्यानंतर त्यांना वाटले आपला इहलोकाचा जीवन यात्रेचा प्रवास संपलेला आहे. म्हणून त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले दहा दिवसानंतर म्हणजे 1 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली व ते कैलासवासी झाले.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य या सद्गुरु माऊलीला माझी ही भावपूर्ण शब्द पुष्पांजली अर्पण करते.मी निरक्षर आहे.एकही दिवस शाळेत गेले नाही‌.परंतु सद्गुरु माऊलीच्या कृपाआशीर्वादाने, प्रेरणेने व मार्गदर्शनाने गुरूपाठ हे पुस्तक,अनेक लेख,अभंग व आरती संग्रह लेखन केलेले आहे.
शिवाबाई माधवराव सांगवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here