अकोल्यात व्यापाराला मागितली ११ लाखांची खंडणी…खदान पोलिसात गुन्हा दाखल

अकोल्याचा सिंधी कॅम्प परिसरातील हिराबाई प्लॉट या ठिकाणी नरेश जीवतरामाणी यांना जिम सुरू ठेवण्याकरिता तेथील शेजारी असलेले सुनील भाटिया या इसमाने जिम चालवायची असेल तर अकरा लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा प्रकार घडला असून त्याबाबत तक्रारदार यांनी ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग सह तक्रार दिली होती. सदर प्रकरणी खदान पोलिसांनी चौकशी अंती शनिवारी आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.             

सिंधी कॅम्प परिसरातील हिराबाई प्लॉट या ठिकाणी सन 2019 मध्ये व्यावसायिक नरेश जीवतरामाणी यांनी डीजे स्टुडिओ या नावाने जिम सुरू केली होती. निखिल जगमलानी हा युवक तेथे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. जिम सुरू झाल्यापासूनच शेजारी राहत असलेले सुनील भाटिया यांनी सदर व्यवसायिकाला व व्यवस्थापक यांना जिम बाहेर येऊन गोंधळ घालणे,अश्लील शिवीगाळ करणे असे नाहक त्रास देणे सुरू केले होते.

या प्रकरणी जिम संचालकाने खदान पोलीस ठाण्यात त्यावेळी तक्रार सुद्धा केली होती. तदनंतर ही सदर इसमाद्वारे विविध कारण पुढे करत त्रास देणे सुरूच होते. त्याबाबत पुन्हा व्यवस्थापक निखिल जगमलानी याने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.तदनंतर सदर भाटियाकडून जिम चालवायची असेल व हे सर्व त्रास बंद करायचे असेल तर अकरा लाख रुपयाची मागणी सुरू होती.

त्याबाबत त्याला व्यवस्थापक निखिल जगमलानी याने आपल्या प्रतिष्ठानावर बोलावले असता त्याने तिथे येऊन अकरा लाख रुपये जाऊदे त्याऐवजी सहा लाख दे तरच तुमची जिम चालू देणार अश्या भाषेत चक्क खंडणीची मागणी केली. याबाबत सर्व ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग चे पुरावे तक्रारदाराने खदान पोलिसांना तक्रार देतेवेळी दिले होते . सदर पुरावे तपासत या प्रकरणाच्या चौकशी अंती खदान पोलिसांनी आरोपी सुनील भाटिया विरुद्ध भांदवी कलम 384, 504, 506 नुसार गुन्हे दाखल केले असून आरोपी फरार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here