महाकवी कालिदास दिनानिमित्त रंगले बहारदार कवी संमेलन…

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक द्वारा संचालित भरतमुनी ललित कला केंद्र आणि विदर्भ साहित्य संघ शाखा रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढस्य प्रथम दिवसे या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

गडमंदिर परिसरातील कालिदास स्मारकावर संपन्न झालेल्या या कवी संमेलनाचे उद्घाटन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वित्त व लेखा अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघ शाखा रामटेक चे अध्यक्ष श्रीरामजी आष्टनकर उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. गिरीश सपाटे , भरतमुनी ललित कला केंद्राच्या समन्वयक डॉ. ललिता चंदात्रे , डॉ. जगदीश गुजरकर उपस्थित होते.

महाकवी कालिदास यांच्या दिनानिमित्त आयोजित या आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या या कवी संमेलनाची सुरुवात महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व तिचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विश्वविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. वसंतकुमार भट्ट यांनी केले. कवी कालिदास यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या अलौकिक प्रतिभेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यकृतींचा त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून धावता आढावा घेतला.

या कवी संमेलनाच्या निमित्ताने सुरुवातीला शोकसभेचे आयोजन करण्यात आले आणि रामटेक परिसरातील तसेच विदर्भ साहित्य संघाचे सदस्य असलेले कवी साहित्यिक सदस्य कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. या कविसंमेलनाला रामटेक परिसरातील अनेक कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून रसिकांची मने जिंकून घेतलीत.

यात प्रामुख्याने दिनेश बसेने, शिल्पा ढोमने, संतोष ठकरेले , नचिकेत देशपांडे , सचिन चव्हाण, नामदेव राठोड, राकेश खलासने, प्रशांत बावनकुळे, तुषार चव्हाण, महेश सावंत , डॉ. जगदीश गुजरकर, डॉ. ललिता चंदात्रे , डॉ. राम जोशी, डॉ. गिरीश सपाटे, अनिल वाघमारे यांनी कविता सादर करून रसिकांना आषाढ दिवसाच्या पहिल्या दिवशी आपल्या ओजस्वी आणि बहारदार काव्य सुमनांनी ओलेचिंब केले.

आपल्या अध्यक्षीय संबोधनातून श्रीरामजी अस्टनकर यांनी महाकवी कालिदास यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपल्या काव्यरचना त्यांना समर्पित केल्यात .या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन योगिता गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. जगदीश गुजरकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here