पातूरचे थोर समाजसेवक रामकृष्ण गाडगे यांचे निधन…

पातूर – निशांत गवई

ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नारायण गाडगे (वय ८०वर्षे) यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांच्या मागे पत्नी,२मुले,४मुली,सुना नातवंडे असा सुशिक्षित परिवार आहे.

आद्यक्रांतीकारक ज्योतिबा फुले यांनी १८६९ साली छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावर शोधून काढली व पहिली शिवजयंती साजरी केली.महानसुधारक ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा पातूरचे कै रामकृष्ण गाडगे यांनी घेतला व पातूर शहरात पहिली छ्त्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून पातूर शहरात इतिहास उभा केला.

पातूर हे शहर अकोला शहराच्या जवळ असले तरी पातूर शहरात बाजारपेठ उपलब्ध नव्हती. छोट्या छोट्या वस्तूसाठी अकोल्यास जावे लागत असत.ही पातूरकरांची गरज लक्षात घेऊन कै रामकृष्ण गाडगे यांनी पुढाकार घेऊन स्वतः किराणा दुकान सुरू केले व इतरांना बाजारपेठ उभी करण्यास प्रेरित केले.

त्यामुळे पातूरची बहरलेली बाजारपेठ दिसते त्याचे पूर्ण श्रेय कै रामकृष्ण गाडगे यांना जाते.सामाजिक क्षेत्रात सतत क्रियाशील असणारे कै रामकृष्ण गाडगे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून विविध सामाजिक संस्थांना पाठबळ देण्याचे काम कै रामकृष्ण गाडगे यांनी केले.

50 वर्षे एकत्र कुटुंब!

कै रामकृष्ण गाडगे यांचे सुरुवातीचे जीवनमान खूप हलाखीचे होते.मातीची भांडी व फाटकी गोधडी वापरून दिनचर्या केली.दोन भावंडे व त्यांच्या परिवारासह ५० व्यक्तींचे एकत्र कुटुंब ५०वर्षे एकत्र राहून सर्व मुलांना चांगली शिकवण व शिक्षण देऊन घर सुसंस्कृत व शिक्षित बनवून समाजास आदर्श घालून दिला.

कै रामकृष्ण गाडगे यांना २मुले व ४ मुली असा परिवार असून एक मुलगी डॉक्टर दोन मुली प्राध्यापक व एक शिक्षिका व दोन मुले व्यवसायिक असून कमी शिक्षण घेणारा व्यक्ती काय करू शकतो याची त्यांनी शिकवण दिली आहे.

कै रामकृष्ण गाडगे हे आदर्श विचाराचे होते त्यांचे अनेक उदाहरणे म्हणजे मुलगा व मुली मध्ये ते अजिबात भेदभाव करीत नव्हते याउलट “मी मेल्यानंतर मला माझ्या चार मुलींनी खांदा द्यावा” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.त्यांच्या इच्छेनुसारच परवा त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या ४ मुलींनी खांदा देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली.

प्रसिद्धी न घेणारे कै गाडगे

प्रसिद्धीस सतत मागे मात्र कामात पुढे असणारे कै रामकृष्ण गाडगे यांची सामाजिक,शैक्षणिक,व्यापारी इत्यादी क्षेत्रात भरीव कामगिरी होती त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्व क्षेत्रातील तरुण,थोर अबालवृद्ध हळहळ व्यक्त करीत असून त्यांच्या जाण्याने पातूर शहरात निर्माण झालेली पोकळी पुन्हा भरून निघणार नाही अशी खंत अनेकजण व्यक्त करीत आहे कै रामकृष्ण नारायण गाडगे या साधे राहणीमान व उच्च विचार,आचार असणाऱ्या “थोर समाजसेवकांना” विनम्र अभिवादन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here