भंडाऱ्यात अल्फा फॅशन हाऊसवर छापा…कारवाई मात्र शून्य…पालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम

भंडारा : आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जिल्हा प्रशासनाने भंडारा शहरातील दुकाने सुरू व बंद करण्याची वेळ निर्धारीत केलेली आहे. मात्र, या नियमाचा भंग करणाऱ्या भंडारा शहरातील अल्फा फॅशन हाऊसवर पालिका प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. मात्र, कारवाई न करताच पथक हात चुरगाळत परत गेले. ही आश्चर्यकारक छापामार कारवाई आज बुधवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाली.

बुधवारला सायंकाळी सहा वाजतानंतरही अनेक दुकाने सुरू असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनात आल्याने भंडारा पालिका प्रशासन तथा भंडारा पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या दुकानदारांना तंबी व कारवाई करण्याचा सपाटा सुरू होता. याच मोहिमेअंतर्गत कारवाई करणाऱ्या संयुक्त पथकाला शहरातील अल्फा फॅशन हाऊसचे शटर बाहेरून बंद दिसले. मात्र, दुकान आतमधून सुरू असल्याचे या पथकाच्या निदर्शनात आले.

त्यामुळे त्यांनी दुकानाचे बंद असलेले शटर ठोठावले. आत असलेल्या काहींना दुकानाच्या बाहेर काढले. यानंतर अल्फा फॅशन हाऊसच्या संचालकाला धारेवर धरले. त्यावेळी सदर व्यावसायिकाने ‘अल्फा फॅशन हाऊस’ चे उद्घाटन व्हायचे असून दुकानात असलेले सर्व हे कर्मचारी असल्याची बतावणी करून ते सामान लावीत असल्याचे सांगितले. यानंतर कारवाईसाठी सरसावलेले पथक व्यावसायिकाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून गपगुमान हात चुरगाडत आश्चर्यकारक परत निघाली.

शहरातील व्यवसायिकांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याची मुभा दिली आहे. भंडारा शहरातील अनेक व्यावसायिक आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत आखून दिलेल्या नियमांचा भंग करून व्यापारी प्रतिष्ठाने सुरू ठेवून व्यवसाय करीत आहे. मात्र, कुठल्याही प्रकारच्या कारवाया होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मागील काही दिवसांपासून शहरातील रुग्णांच्या आणि मृतकांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे.

त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वात वेगवेगळी पथके गठीत करून नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी सदर कारवाई बघण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली. मात्र, कर्तव्यावरील पोलिसांनी कोरोना संक्रमणाचा वाढता प्रभाव बघता कारवाईदरम्यान नागरिकांना तिथून हुसकावून लावले. याप्रकरणी भंडारा पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अल्फा फॅशन हाऊसचे उद्घाटन व्हायचे आहे. दुकानातील कर्मचारी सामान लावीत होते. त्यामुळे पथकाने कारवाई केली नाही.

व्यापारी प्रतिष्ठाने सुरू आणि बंद साठी जे नियम प्रशासनाने निर्धारित केले आहे. ते सर्वांना तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. नियमभंग करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केल्या जाते. मग, हा नियम अल्फा फॅशन हाऊसला लागू नाही का? दुकानाचे उद्धाटन व्हायचे असल्यास त्याला हा नियम लागू होत नाही का? अल्फा फॅशन हाऊसने आपत्ती व्यवस्थापनचा नियम मोडला नाही का? एकीकडे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.

मग अल्फा फॅशन हाऊसवर पालिका पथक मेहेरबान का? नियम आपत्ती व्यवस्थापनाच्या संबंधातील असल्याने तो सर्वांना सारखा लागू नाही का? सदर दुकानात सोशल डिस्टन्सिंग होते का? आपत्ती व्यवस्थापनाने ज्या अटीशर्थी लावल्या आहेत, त्याचे पालन केले का? नियम म्हणजे नियम, असे सर्वांना सांगणारे पालिका आणि पोलिसांचे कारवाई पथक यापुढे सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यापाऱ्यांना कारवाईतून सोडतील का? याचे उत्तर नाही, असे असेल तर अल्फा फॅशन हाऊसवर निश्चितच आपत्ती व्यवस्थापनाचा नियमभंग केल्या प्रकरणी कारवाई अपेक्षित आहे. पालिका आणि पोलीस प्रशासन कारवाई करते का? याकडे भंडारा शहरवाशीयांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here