राणेंच्या बेल वर प्रश्नचिन्ह? नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली…

फोटो - सौजन्य गुगल

न्युज डेस्क- नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने बेलवर प्रश्नचिन्ह कायम आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. 17 जानेवारीला राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे.

सत्र न्यायालयाने तीन दिवसांच्या दिर्घ सुनावणीनंतर नितेश राणे यांचा जामीन फेटाळत राणेंना झटका दिला आहे. त्यानंतर नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई हायकोर्टात हे प्रकरण पोहोचले आहे. राणेंच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या चार दिवसात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना आता हायकोर्टात तरी दिलासा मिळणार का? की राणेंना अटक होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला मात्र सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळत राणेंना दणका दिला. संतोष परब यांच्याबाजूने शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळतोय. राणे विरुद्ध सेना असा संघर्ष यामुळे निर्माण झालाय.

काही दिवसांपूर्वीच कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजवल्याने राज्यातले राजकारण तापले होते. नितेश राणे यांचा पोलीस शोध घेत होते. त्यावेळी नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू असता नितेश राणे कुठे आहेत? असे विचारल्यावर, सांगायला मुर्ख आहे का? असे उत्तर दिल्याने बराच वाद पेटला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here