मुर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पुर्ण करावे…अन्यथा आंदोलन !…राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुर्तिजापूर शहरामध्ये शिवाजी चौक ते मोरारजी चौकापर्यंत 23 करोड 67 लक्ष रुपये काँक्रीट रोडकरीता दि. 29.01.2018 ला निधी मंजुर केला होता. परंतु 1 कि.मी. 350 मी. काँक्रीट रोडचे काम गेल्या 4 वर्षापासुन सुरु आहे. या रोडचे काम सुरु असतांना अनेक नागरीकांचे अपघात झाले. एका शाळकरी विद्यार्थीनीचा अपघातामध्ये हात तुटून निकामी झाला होता.

अशा परिस्थितीमध्ये अनेक राजकीय पक्षांनी, विविध संघटनांनी संबंधित विभागाकडे अनेक तक्रारी केल्या, आंदोलने, उपोषणे केली. तरी सुध्दा हा काँक्रीट रोड आजरोजी पुर्णतवास गेला नाही. ही बाब नागरीकांच्या दृष्टीकोनातुन गंभीर आहे. यावरुन सार्वजनिक बांधकाम विभाग / रोडचे कंत्राटदार मुर्तिजापूर शहरातील नागरीकांच्या जिवावर उठली आहे, हे सिद्ध होते. अशा परिस्थितीमध्ये मुर्तिजापूर शहराच्या बाजुला 22 कि.मी. अंतरावर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहर आहे. त्या शहरामध्ये 6 महिन्याअगोदर अंदाजे 2 कि.मी. काँक्रीट रोडचे काम सुरु झाले होते, ते काम आजरोजी पुर्ण होतांना दिसुन आले.

दर्यापुर येथील रोडचे काम 6 महिण्यात पुर्ण होणे आणि मुर्तिजापूर येथील रोडच्या कामाला 4 वर्ष लागणे, काम करण्याच्या पध्दतीमध्ये ही फार मोठी तफावत दिसुन येते. या रोडच्या कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करुन त्या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकून काँक्रीट रोडचे सुरु असलेले काम डिसेंबर 2021 पर्यंत पुर्ण करण्यात यावे. असे न झाल्यास सोमवार दि. 03 जानेवारी 2022 ला राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण व शहरातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, मुर्तिजापूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार.

असे प्रतिपादन शहर अध्यक्ष शुभम मोहोड, रक्षित पाटील, बिपीन चौरपगार, आकाश पांढरे, शेखर कावरे, आशु भेले, संदीप घाटे, प्रदिप पाटील, दिलीप इनवाते, प्रतिक नागरीकर, राजु गावंडे इत्यादिंनी आमच्या प्रतिनिधीसमोर केले. तसेच ह्या तक्रारीची प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकजी चव्हाण, पालकमंत्री बच्चुभाऊ कडु, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अकोला, SDO मुर्तिजापूर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मुर्तिजापूर यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती विद्यार्थी प्रमुख ऐश्वर्या मोहोड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here