श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे रस्याव ग्रंथाचे प्रकाशन…

राहुल मेस्त्री

आडी ता.निपाणी येथील श्रीदत्त देवस्थान मठ येथे परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी लिहिलेल्या “रस्याव” ग्रंथाचे प्रकाशन आश्रमस्थांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 16 जुलैला संपन्न झाले. या निमित्ताने प. पू. परमात्मराज महाराज म्हणाले की, “रस्याव” ग्रंथामध्ये आध्यात्मिक मार्गाविषयीची साद्यन्त माहिती आहे.

मनस्वास्थ्य मिळवून देणाऱ्या अनेक पद्धतींचे या ग्रंथात विस्ताराने विवरण आहे. या ग्रंथामध्ये अध्यात्मक्षेत्रीय मानसशास्त्र व आधुनिक विज्ञानाधारित मानसशास्त्र या दोन्हींचा सुयोग्य संगम झाला असल्याचे वाचकांना समजून येईल. विविध भावसंशुद्धिप्रक्रियांचा अंतर्भाव देखील या ग्रंथात आहे.”

प. पू. परमात्मराज महाराज म्हणाले” सध्याच्या काळात जनतेमध्ये ताणतणाव वाढले आहेत. न्यूनगण्ड, अहंगण्ड, भयगण्ड तसेच इतरही अनेकानेक प्रकारच्या व्यतिगण्डांच्या बाधेमुळे अनेकजन त्रस्त आहेत. अनावश्यक एवढ्या चिंता, हताशवृत्ती (डिप्रेशन) इ.मुळे अनेकजन अंतःकरणे घायाळ झाली आहेत.

सध्याच्या कोरोना महासंकट काळात तर अशा बाबी अधिकच वाढल्या आहेत. जास्तीत जास्त वेळ घरीच बसून राहावे लागत असलेल्या या काळात रस्याव ग्रंथ वाचकांच्या मनाला प्रफुल्लित करण्याचे काम करेल, मनाला नवी ऊर्जा प्रदान करेल.परमाब्धि ग्रंथातील वैश्विक धर्मसिद्धान्त हे वैज्ञानिक दृष्टीनेही पूर्णसत्यच आहेत, याची जाणीव हा ग्रंथ वाचतांना भाविकांना होणे स्वाभाविक आहे.”

तत्पूर्वी दि.16 रोजी सकाळी भगवान् दत्तात्रेयांच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. दत्तगुरूंच्या पादुकांवर रस्याव ग्रंथ समर्पित करून ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी श्री देवीदास महाराज, श्री नामदेव महाराज, श्रीराम महाराज, श्री अमोल महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराज हे उपस्थित होते.

या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये रस्याव या नांवाचे सोळा अर्थ दिलेले आहेत. हे वाचून ग्रंथाची व्याप्ती वाचकांना कळून येते. ग्रंथाच्या अनुक्रमणिकेकडे बघितल्यावर या ग्रंथातील विषयांचा प्रचंड मोठा आवाकाही लक्षात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here