नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने मदत द्या, काँग्रेस शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

मुंबई – मराठवाड्यासह राज्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगीच्या काळात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यामध्ये आहे. ऊस, बाजरी, मका, कापूस, तूर, सुर्यफुल, कांदा, तसेच फळ बागांचे मोठे नुकसान झालेले आहे.

या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आज अतिवृष्टीग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात तुळजापूर काँग्रेस शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रु. मदत देण्यात यावी.

अतिवृष्टीने मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी फळबागांसाठी वेगळे पॅकेज देण्यात यावे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे. अतिवृष्टिमुळे पडझड झालेल्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात यावे, या मागण्या काँग्रेस नेत्यांनी केल्या आहेत.

या शिष्टमंडळात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, आ. अमर राजुरकर, आ. धीरज देशमुख, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, 

सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळ्ळोलगी, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सुनिल चव्हाण, उस्मानाबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रदेश सचिव अमर खानापुरे, माजी जि. प. सदस्य दिलीप भालेराव, सभापती सचिन पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजित पाटील, राहुल लोखंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here