राज्यात महाविकास आघाडी सरकारही कोरोनाची मोफत लस देईल…अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

न्यूज डेस्क – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीही मोफत लस देईल असं राज्याचे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. देशात कोरोनाचा उद्रेक झाला त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी घेतलेले निर्णयच कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मलिक म्हणाले, जानेवारी महिन्यातच आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि सागरी मार्ग बंद केले असते तर कोरोनाचा शिरकाव देशात झालाच नसता. आज जे हजारो मृत्यू आणि संसर्ग पसरत आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील वक्फ बोर्ड कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कोरोना लसीचं राजकारण करत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तिला लस मोफत देण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोरोनाची मोफत लस उपलब्ध करून देईल. मात्र बिहार निवडणुकीसाठी भाजपने हा राजकीय मुद्दा बनवला, असे मलिक म्हणाले.

भाजप सरकारच्या काळात वक्फ बोर्डात झालेल्या अनियमिततेचा तपास करण्यात येत आहे. संपूर्ण कामकाजाचे डिजिटलायजेशन करण्यात येत असून लवकरच हे काम पूर्ण होईल. त्यानंतर बोर्डाचे सर्व कामकाज ऑनलाइन सुरू होईल असे ते म्हणाले. ज्यांच्यावर आरोप आहेत अथवा खटले सुरू आहेत अशांना बोर्डावर घेतले जाणार नाही. मराठवाड्यातून दोन खासदारांची नियुक्ती करावयाची आहे, त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

वक्फ बोर्डाचे शहरातील कार्यालय मुंबईला हलवण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्र दिल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या सोयीसाठी औरंगाबाद येथील कार्यालय हलवू नये, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. मात्र राज्यभरातील लोकांना मुंबई सोयीची पडत असल्याने कार्यालय मुंबईला हलवले जाईल आणि विभागीय कार्यालय मात्र औरंगाबादला देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याला बोर्डाचे ऑफिस स्थापन करण्याचा निर्णयही सरकारने घेणार असल्याचे मलिक म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here