खेड तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा पुरवा – शरद बुट्टे पाटील…

राजगुरूनगर ( पुणे ) ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या मोहिमेअंतर्गत खेड तालुक्यातील हॉटस्पॉट असलेल्या गावांमधील लोकांची घरटी कोरोनाचे सर्वेक्षण तपासणी करण्यात येत आहे.परंतु जिल्हा परिषदेकडून तपासणी साहित्य देण्यात आले नसल्याने तपासणी करताना मोठ्या अडचणी येत आहेत.

यावरून जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.औद्योगिक क्षेत्रात पुणे,पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने चाकण एमआयडीसीत येत आहे.यामुळे मोठ्या संख्येने कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

यासाठी हॉटस्पॉट असलेल्या गावांमधील लोकांची घरटी ऑक्सिजन पातळी,तापमान तपासणी करण्यासाठी ऑक्सिमीटर व थर्मल मशीनची गरज असते.परंतु पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारने या साहित्यांचा पुरवठा केला नाही.तर स्थानिक ग्रामपंचायतला लाखो रुपये खर्च करून हे साहित्य घेणे परवडण्यासारखे नाही.

ऑक्सिमीटरचा वापर जास्ती जास्त पंचवीस ते तीस लोकांना वापरून झाल्यावर ऑक्सिजन पातळी खरी दाखवत नाही.त्यामुळे करण्यात येत असलेल्या तपासण्या नक्की खऱ्या का ? असा प्रश्न बुट्टे पाटील यांनी केला आहे.

खेड तालुक्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत शेकडोने रोज भर पडत आहे. दोन कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयामध्येही मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार सुरू आहे.काही रुग्णालयात व्हेंटिलेटर असूनही रुग्णांवर उपचार न करता पुढील खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला जातो आहे.

हे गरीब रुग्णांना परवडण्यासारखे नाही.जिल्हा परिषद अध्यक्ष तालुक्याचे असुनही आरोग्यासाठी लागणारे साहित्य देताना जिल्हा परिषदेकडून सापत्न वागणूक दिली जात आहे.याबाबत भाजपचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य यांनी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

तालुक्यातील गरीब लोकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडण्यासारखे नाही.यासाठी दोन दिवसांत तालुक्याला लागणारे आरोग्य साहित्य देण्याची व्यवस्था करावी असे बुट्टे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सांगितले.नावाला कोविड सेंटर उभे करून रुग्णांना सुविधा उपलब्ध निर्माण करून देणे हे सरकारची जबाबदारी आहे.

तसे न करता जाणीवपूर्वक रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो आहे.लवकर सर्व व्यवस्था देण्यात याव्यात अन्यथा भाजपच्या वतीने आवाज उठवला जाईल असे बुट्टे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here