औरंगाबादेत मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेर्धात काळे झेंडे फडकाविले…

मनोहर निकम, महाव्हाईस न्यूज.

न्यूज डेस्क :- सर्वोच्य न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द करताच महाराष्ट्रातील मराठा समाजात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मराठा समाज विविध मार्गाने सत्ताधारी व राजकीय पक्षांचा तसेच निष्क्रीय नेत्यांचा निषेध व्यक्त करीत आहे.याच पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसी परिसरातील सकल मराठा समाजाने एकत्र येत आज काळे झेंडे फडकावून तसेच निषेधाच्या काळ्या पट्ट्या लावून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला.

ज्यांची सत्ता आली त्या प्रत्येकांनी कुचकामी आरक्षण देऊन समाजाची बोळवण केली आहे, म्हणूनच मराठा समाजावर ही दुर्दैवी वेळ आली असल्याची व गेल्या चाळीस वर्षांचा लढा एका झटक्यात वांझोटा ठरल्याची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. हा रोष सर्वोच्य न्यायालयाच्या विरोधात नसून राज्यकर्त्यांच्या विरोधात समाजाचा रोष असल्याचे मत आरक्षण चळवळीतील जाणकार व्यक्त करीत आहे.

केंद्र व राज्य सरकारने या दोघांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश झाला पाहिजे. केंद्र व राज्यातील दोन्ही सत्ताधाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत. अन्यथा परत एकदा समाजाची अस्वस्थता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा श्री स्वराज्य प्रतिष्ठान (वाळूज) चे संस्थापक नितीनभैय्या देशमुख यांनी या निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. कोरोना काळातील सर्व शासकीय नियमांचे पालन करीत आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त करीत हे निषेध आंदोलन पार पाडले. यावेळी श्री नितीन देशमुख यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात ज्ञानेश्वर नीळ, उमेश दूधाट, दिनेश दूधाट, राजू शेरे,दीपक गायकवाड,औदुंबर देवडकर,पोपट तांगडे,पंकज गावंडे,विक्रम आळंजकार, शंकर गरुड,गजानन खाडे आदींसह मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here