राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार…

कृत्रिम रेतनाद्वारे लिंग निदान केलेल्या वीर्यमात्रा वापरून पशुपालकांसाठी उच्च वंशावळीच्या कालवडी निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा क्रांतिकारी निर्णय…

राज्यात शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रा (Sex Sorted Semen) वापर करून उच्च अनुवंशिकतेच्या कालवडी तथा पारड्यांची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही वीर्यमात्रा फक्त ८१ रुपयांना उपलब्ध करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

लिंग विनिश्चित वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांच्या  हस्ते मंत्रालयात उद्घाटन झाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची उपस्थिती होती. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह,अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे हे ऑनलाईन उपस्थित होते. तर सहसचिव माणिक गुट्टे,अवर सचिव शैलेश केंडे यांचीही उपस्थिती होती.

माध्यम प्रतिनिधींशी ऑनलाईन बोलताना श्री.केदार  म्हणाले , या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावणारा हा पशुसंवर्धन विभागाचा निर्णय आहे. फिरत्या पशुचिकित्सालयांद्वारे व पशुसंवर्धन विभागाच्या प्रत्येक अधिकारी- कर्मचारी यांच्यामार्फत या उपक्रमाची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा अशा सूचनाही त्यांनी यावेळी त्यांनी दिल्या.

कृत्रिम रेतनासाठी लिंग निदान केलेल्या वीर्यमात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला असून यातून जवळपास ९०% उच्च वंशावळीच्या गाई म्हशींच्या मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.

सर्वसाधारणपणे 1100 ते 1200 रुपयांपर्यंत मिळणारी वीर्यमात्रा केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्यामुळे पशुपालकांना  ८१रुपये इतक्या माफक दरामध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगून पशुपालकांना नजीकचे पशुवैद्यकीय दवाखाने आणि सहकारी / खाजगी दूध संघ यांच्याकडे ही वीर्यमात्रा उपलब्ध होणार आहे.

उच्च वंशावळीचा मादी वासरांची निर्मिती होऊन भविष्यात राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. नर वासरांच्या संगोपनावरील खर्च कमी होऊन वाढीव दूध उत्पादनामुळे पशुपालक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here