पेंच मध्ये मान्सून पर्यटकांचे स्वागताची तयारी…

रामटेक – राजु कापसे

अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे डॉ. प्रभू नाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पावसाळी पर्यटन सुरु करण्याबाबत पेंच व्याघ्र प्रकल्पासभोवताल असणाऱ्या रिसोर्ट चालकांसोबत चर्चा करण्यात आली.

सदर चर्चेत पवनी बफर क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या पर्यटन रोडची लांबी व स्थिती बाबत चर्चा केली. तसेच पवनी बफर क्षेत्रात नवीन नेचर ट्रेल (निसर्ग पायवाट) तयार करण्याबाबत चर्चा केली. पेंच रिसॉर्ट संघटनेमार्फत मा. उपसंचालक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

\यावेळी रिसॉर्ट मालकांनी पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा देण्याकरता सिल्लारी पर्यटन संकुल येथे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा मध्ये वाढ करणे, निसर्ग मार्गदर्शक यांचे ग्रेडेशन करणे, निसर्ग मार्गदर्शक यांचे प्रशिक्षण अश्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. व्याघ्र संवर्धनातून स्थानिकांना रोजगार उपलब्धता तसेच रिसोर्ट चालकांची संवर्धनात योगदान देणेबाबत श्री. अतुल देवकर यांनी भूमिका मांडली.

उपसंचालक यांनी आपल्या मनोगतात निसर्ग मार्गदर्शक आणि रिसॉर्ट चालक यांनी पर्यटकांमध्ये वाघाबरोबरच इतर प्राणी आणि जंगलातील समृद्ध जैवविविधता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याबाबत प्रयत्न करावेत असे आवाहन केले. रिसॉर्ट चालकांनी संवर्धन शुल्काच्या माध्यमातून व्याघ्र संरक्षणात मोलाचे योगदान देण्याबाबत उपसंचालक यांनी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच यावेळी रिसॉर्ट चालक यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उपसंचालक यांनी दिले. सदर सभेत रिसॉर्ट चालक श्री. मोहब्बतसिंह तूली, श्री चंद्रपाल चोकसे, श्री नवीन चोकसे, श्री संदीप सिंग, श्री विशाल वैद्य, श्री स्वानंद सोनी, तसेच जीप्सी चालक प्रतिनिधी श्री वर्मा, गाईड प्रतिनिधी व वन विभागातर्फे सहायक वनसंरक्षक श्री अतुल देवकर, वन परिक्षेत्र अधिकारी श्री मंगेश ताटे, श्री प्रियदर्शन बाभळे, श्री प्रदीप संकपाळ व श्री प्रतीक मोडवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here