वंचित आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकरांनी इंदुमिलच्या जागेवर होणार्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला दुसर्यांदा विरोध दर्शविला आहे.
यावर प्रतिक्रिया देतांना समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकुंद खैरे म्हणाले की, बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध हा बाबासाहेबांना प्राणपणाने मागणार्या जनतेच्या श्रद्धेचा अपमान होय. इंदुमिलची जागा ही सहजासहजी मिळालेली जागा नाही तर हजारों आंबेडकरी कार्यकर्ते आणि बौद्ध भिक्षुंच्या आंदोलनाची फलश्रृती आहे. असे प्रा.खैरे यांनी निक्षुन सांगितले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणुन देशात बाबासाहेबांचा 450 फुट उंचीचा पुतळा उभा होत असेल तर बाबासाहेबांना मानणार्या तमाम जनतेसाठी तसेच देशासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असताना नरेंद्र मोदी यांनी इंदूमिलच्या जागेचे भूमिपूजन केले होते. त्याप्रसंगी प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास विरोध का केला नाही? म्हणजे भाजपाच्या काळात पुतळा झाला असता तर श्रेय भाजपाला मिळाले असते आणि आज भाजपा नसल्यानेच प्रकाश आंबेडकरांचा विरोध सुरू असल्याचा आरोप प्रा.खैरे यांनी केला.
स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याऐवजी तो निधी लोकोप्रयोगी कामासाठी खर्च करण्याची मागणी यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी केली. यावर प्रा.खैरे म्हणाले की, केंद्र सरकारने सुमारे तीन हजार करोड रुपये खर्च करून गुजरात मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा उभा केला.
त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांना लोकोपयोगी कामे दिसली नाही काय? कदाचित प्रकाश आंबेडकरांना मानणार्या जनतेला बाबासाहेबांचा पुतळा मान्य नसेल? तसेच प्रकाश आंबेडकर म्हणजे संपुर्ण बाबासाहेबांची जनता असे समजने सुद्धा चुकीचे आहे. जे लोक बाबासाहेबांना श्रद्धेने मानतात त्यांच्या श्रद्धेचे काय? असा प्रश्न यावेळेस प्रा.खैरे यांनी उपस्थित केला असुन सरकारने कोणत्याही दबावाखाली न येता लवकरच स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम घोषीत करावा, अशी मागणी प्रा.खैरे यांनी केली आहे.