न्यूज डेस्क – पंढरपूर मंगळवेढा येथून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आमदार भारत भालके यांचं पुण्यात उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झालं. भारत भालके यांनी पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी ची कोरोनाची लागण झाली होती.
या विषाणूवर मात करत ते बरेही झाले होते. पण कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढला आणि गुंतागुंत निर्माण झाली. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
आमदार भारत भालके हे पंढरपूर मंगळवेढा इथून निवडून आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर संसर्गामुळे त्रास होत असल्याने त्यांना पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ‘पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली असल्याची आणि प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुबी हॉलचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः डॉक्टरांच्या संपर्कात राहून आमदार भालकेंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. पण अखेर डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि भालके यांची प्राणज्योत मालवली.