अमरावती मनपा आयुक्तांवर शाई फेकणाऱ्या ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल…

अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यासोबतच चबुतराही काढून घेतल्याने युवा स्वाभिमान या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ९ रोजी दुपारी राजापेठ उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी गेलेले मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर काही महिला व पुरुषांनी निषेधाचे निवेदन देतानाच शाई फेकून रोष व्यक्त केला. याप्रकरणी मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुतळ्याचे राजकारण केले जात असल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. मनपा आयुक्त भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार याची माहिती असल्यामुळे काही महिला व पुरुष तेथे आधीपासूनच उपस्थित होते. आयुक्त आल्यानंतर त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. यावेळी एका महिलेने आयुक्तांना धरून ठेवले होते. त्याचवेळी इतर काही जण त्यांच्या अंगावर शाई ओतत होते. यामुळे भुयारी मार्गाची भिंत व रस्त्यावर शाई सांडली. मनपा आयुक्तांचे कपडे, चेहरा शाईमुळे खराब झाला. यावेळी त्यांच्यासोबत एक सुरक्षा रक्षक होता. परंतु, आठ ते दहा जणांच्या जमावापुढे त्याचे प्रयत्न थिटे पडले. त्याने नंतर आयुक्तांना धरून त्यांच्या कारमध्ये बसवले. यादरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणाही शाई फेकणाऱ्या महिला व पुरुषांकडून देण्यात आल्या.

मनपा आयुक्तांवर शाई फेकल्यामुळे महानगर पालिकेत खळबळ उडाली. या प्रकाराचा निषेध म्हणून मनपा कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बुधवार ९ रोजी दिवसभर कामबंद आंदोलन केले. तसेच कर्मचारी कोतवाली पोलिस ठाण्यातही जाऊन आले. त्यामुळे मनपात सर्वत्र शांतता होती. याबाबत आयुक्तांना विचारले असता कर्मचाऱ्यांनी विचलित न होता गुरुवार १० पासून नियमितपणे कामकाज करावे, असे निर्देश दिले.

या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजापेठ ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी पोलिस आयुक्त डाॅ. आरती सिंह यांनीही या घटनेचा आढावा घेतला. पोलिस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलिस आयुक्त भारत गायकवाड राजापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी या प्रकरणी वरिष्ठांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here