जिल्ह्यात केशकर्तनालये व ब्युटीपार्लर सुरु करण्यास परवानगी…जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश…अटी व शर्ती…वाचा

अकोला – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या दि.३ जूनच्या आदेशान्वये संपूर्ण अकोला शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सर्व प्रकारची केशकर्तनालयाची दुकाने, सलुन, स्पा, ब्यूटी पार्लर बंद राहतील, असे जाहीर करण्यात आले होते.

तथापि, या आदेशात बदल करुन केशकर्तनालय (कटींग) सलून आणि ब्युटीपार्लरची दुकाने रविवार दि.२८ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत.

या आदेशान्वये केशकर्तनालयाची दुकाने सुरु करण्याची परवानगी देतांना कोरोना संसर्ग फैलाव होऊ नये यासाठी काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत. त्या अटी व शर्तींचे पालन संबंधित व्यावसायिकांनी करावयाचे आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अटी व शर्तीः-

१. केशकर्तनालयाची दुकाने, सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये केवळ ज्या ग्राहकांनी पूर्व नोंदणी केली असेल अशा ग्राहकांना प्रवेश देण्यात यावा. इतर व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित राहील.

२. सलुन व ब्युटीपार्लर मध्ये केवळ कटिंग, डाइंग, वॅक्सींग व थ्रेडींग इत्यादी करण्याकरिता मुभा राहील. त्वचेशी संबंधीत सेवांना परवानगी असणार नाही. या बाबत दुकानाचे दर्शनीभागामध्ये स्पष्टपणे दर्शविले जावे.

३. सलुन व ब्युटीपार्लर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोव्हज, एप्रॉन व मास्क वापरणे बंधनकारक राहील.

४. प्रत्येक सेवेनंतर सर्व परिसर (खुर्चीचा) स्वच्छ करावा. सामुहिक वापरात येणारे पृष्ठभाग व फ्लोअरिंगची दर दोन तासांनी स्वच्छता करावी.

५. ग्राहकांसाठी डिस्पोसेबल टॉवेल, नॅपकिन्सचा वापर करणे बंधनकारक राहील. प्रत्येक सेवेनंतर नॉनडिस्पोसेबल उपकरणांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.

६. उपरोक्त प्रमाणे घ्यावयाची दक्षता सर्व ग्राहकांचे निदर्शनास आणुन द्यावी.

७. सलुन मध्ये काम करणारे कर्मचारी आणि ग्राहकांसाठी इन्फ्रा-रेड थर्मामीटरचा वापर करण्यात यावा, कोणत्याही व्यक्तीस लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस परवानगी दिली जाऊ नये.

८. ग्राहकांमध्ये शरिरीक अंतराचे (Physical Distancing) चे पालन करावे. तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.

हे आदेश हे दि.३० जूनच्या मध्यरात्री पर्यंत (२४.०० वा.) संपूर्ण अकोला शहर,जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here