चाचण्यांसाठी रुग्णांकडून जादा शुल्क आकारल्यास दंड…जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा इशारा…

अमरावती – सोनोग्राफी, कोरोना चाचणी, सिटी स्कॅन आदी लॅबच्या चाचण्यांचे शुल्क शासन निर्णयानुसार निर्धारित करण्यात आले. त्यानुसार सर्व खासगी रुग्णालयांनी भरती होणाऱ्या रुग्णांकडून विहित शुल्कच आकारावे.

अधिकचे शुल्क आकारून ज्यादा पैसे घेत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फिरते पथकांकडून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.

कोरोनाबाधित रूग्णाला विविध प्रकारच्या तपासण्याव्यतिरिक्त सी. टी. स्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत असल्याने कोविड व नॉनकोविड रूग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली. ते म्हणाले की, मशिनच्या क्षमता वैशिष्ट्यानुसार ही दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे.

एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी 16 स्लाईसच्या मशिनसाठी दोन हजार रूपये, मल्टि डिटेक्टर सीटी (एम डी सीटी) 16 ते 64 स्लाईसच्या मशिनसाठी अडीच हजार रूपये, 64 स्लाईसहून अधिकच्या मशिनसाठी तीन हजार रूपये दर निश्चित केले आहेत.

या रकमेत सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई कीट, डिसइन्फेक्टेड, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे समान दर लागू राहतील. या आदेशापूर्वी जर एखाद्या तपासणी केंद्राचे दर कमी असतील, तर ते कमी दर लागू राहतील.

एचआरसीटी- चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सिटी मशिनद्वारे तपासणी केली ते नमूद करणे बंधनकारक आहे. कोणत्याही डॉक्टरच्या प्रिस्किप्शनशिवाय ही तपासणी करू नये. तपासणी करणा-या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे बंधनकारक आहे. ज्या रूग्णाकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा खासगी आस्थापनेने तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल तर हे दर लागू राहणार नाहीत.

रूग्णालये किंवा तपासणी केंद्रांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर दर्शनी भागात लावणे, तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. एचआरसीटी- चेस्ट तपासणीकरिता निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर (महापालिकेचे क्षेत्र वगळून) जिल्हाधिकारी, तर महापालिकेच्या क्षेत्रात महापालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी आहेत.

त्यानुसार निश्चित दरापेक्षा जादा दर आकारणा-या केंद्रांवर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, नपा मुख्याधिकारी व इतर यंत्रणांना आवश्यक त्या तपासण्या वेळोवेळी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here