दोन रुग्णवाहीकेसाठी एकच चालक, तोही वेतनाविना…

मनसर नगरधन प्रा. आरोग्य केंद्रातील प्रकार… चालकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर… एन.जी.ओ. मार्फत नियमीत वेतन नाही…

रामटेक – राजु कापसे

कोणत्याही वाहनावरचा चालक म्हटलं म्हणजे तारेवरची कसरत असंच सहज तोंडावर येत असते. यातही भरीस भर म्हणजे दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात होणारी वाढ पहाता चालक हा स्वतःचा जिव टांगणीला ठेवुन आपले कर्तव्य बजावतो असे म्हणने वावगे ठरणार नाही.

एवढे असतांना मात्र त्याला त्याच्या त्या सेवेचा मोबदला कित्येक महिन्यांपर्यंत मिळत नसेल तर याहुन मोठी शोकांतिका कोणती म्हणावी लागेल. असाच प्रकार तालुक्यातील मनसर तथा नगरधन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहावयास मिळत असुन गेल्या कित्येक महिन्यांपासुन येथील रुग्णवाहिकेच्या चालकांचे वेतन एन.जी.ओं. मार्फत अदा केलेले नसल्यामुळे अशा चालकांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

रुग्णवाहीकेचा चालक म्हटले म्हणजे त्याला रुग्णाला आणण्यापासुन तर ठरावीक ठिकाणी पोहोचवुन देण्यासाठी केव्हा व कुठे जावे लागेल हे ठराविक व निश्चीतपणे सांगता येत नाही. गेल्या दोन वर्षापासुन कोव्हीड – १९ महामारी काळात या चालकांनी मोठे धाडस दाखवुन आपली कामगीरी बजावली हे विसरण्याजोगी बाब नाही. माहितीनुसार तालुक्यात एकुण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

या सर्वच ठिकाणी दोन रुग्णवाहीका आहेत. पैकी मनसर तथा नगरधन प्रा. आरोग्य केंद्रात मात्र दोन रुग्णवाहिका असुनही त्यावर चालक मात्र एकच आहे अन् तोही गेल्या काही महिन्यांपासुन वेतनापासुन वंचीत असल्याने त्याच्यापुढे अनेक समस्या आ वासुन उभ्या ठाकल्या आहेत. म्हणावे तर म्हणावे कुणाला या विवंचनेत तो चालक दिसुन येत आहे. माहितीनुसार रुग्णवाहीकेवर एन.जी.ओं. मार्फत चालकाची नियुक्ती तथा त्यांचे वेतन अदा करण्यात येते.

मात्र या एन.जी.ओं. मार्फत गेल्या काही महीण्यांपासुन या चालकांचे वेतनच अदा करण्यात न आल्याने ऐन महामारी काळात त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे. तेव्हा अशा रुग्णवाहीका चालकांचे थकीत वेतन एकाच टप्प्यात अदा करण्यात येवुन पुढे नियमीत मासीक वेतन देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

सक्षम एन.जी.ओं. नाच शाशनाने कत्राट द्यावा – शाशन हे एखाद्या एन.जी.ओ. च्या खांद्यावर जबाबदारी टाकुन मोकळे होत असते. यावेळी संबंधीत एन.जी.ओ. हे वेळ पडल्यास स्वतः जवळून खर्च चालविण्याच्या स्थितीमध्ये आहे का, तेवढे सक्षम आहे काय हे त्यांना काम देतेवेळी तपासुन पहात नाही. व येथेच डोंगा बुडत असतो. ”

सरकारी काम अन् वर्षभर थांब ” या उक्तीप्रमाणे कधी कधी शाशनाचे बिल निघण्यास वेळ लागतो मात्र तेवढे दिवस ही एन.जी.ओ. सेवेवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना नियमीत वेतन पुरविण्यास सपशेल फेल ठरत असते. दुष्परिणामतः अशा कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here