धुळ्याच्या महामार्गावर महिलेने दारु पिऊन घातला धिंगाणा…पोलिसांनाही केली धक्काबुक्की…व्हिडीओ व्हायरल…

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्यात महिला आणि पुरुषाने दारु पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चौकशीसाठी आलेल्या पोलिसाचीच कॉलर पकडून महिलेने त्यांना धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा टोलनाक्याजवळ हा प्रकार घडला. भररस्त्यात दारु पिऊन संबंधित महिलेने धिंगाणा घातला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी विचारपूस सुरु केली असता महिलेने पोलिसाची कॉलर पकडली. त्यांना धक्काबुक्की करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार तिथे उभे असलेला पोलीस कर्मचारी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता.

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील जुन्या टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शीतलपासून पुढे असलेल्या महामार्गालगत हा प्रकार घडला. महिला आणि पुरुष रस्त्यावर गोंधळ घालत होते गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी आले. त्या पुरुषाला विचारणा करत असताना महिलेने उलट पोलिसांनाच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

यावेळी घटनास्थळी पोलिसांनी दारुच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. संबंधित महिला आणि पुरुषाने मद्यप्राशन केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here