मुंबई – धीरज घोलप
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि संस्थेच्या पार्कसाईटमधील शाळा व महाविद्यालय समुहाचे संस्थापक, शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विक्रोळी – पार्कसाईट येथील संदेश विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या वतीने कोविड – १९ लसीकरण मोहीमेंतर्गत १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीरात ४८० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
शिबीराचा शुभारंभ पवईतील डाॅ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलच्या वित्त व लेखा विभागाचे जनरल मॅनेजर भूषण पवार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजार व उद्यान समितीचे माजी अध्यक्ष सुधीर मोरे, डॉ. संपदा नलावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या भित्तीशिल्पाला पुष्पचक्र वाहून त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली.
शिबीरास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन प्रभागाच्या प्रभाग समिती अध्यक्ष स्नेहल मोरे, संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता म्हात्रे, विश्वस्त डॉ. समृद्धी मोरे, मेघा म्हात्रे, डॉ. सुयोग म्हात्रे व डॉ. स्वाती म्हात्रे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पथक, संस्थेच्या इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या समर्पण या राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे विद्यार्थी, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर वृंदांनी विशेष परिश्रम घेतले.