शाळा नाही पण शिक्षण आहे;सावित्रीबाई फुले विद्यालयाचा ऑफलाइन शिक्षणासाठी पुढाकार…

शाळाच विद्यार्थ्यांच्या दारी. थर्मल स्कॅनिंग करून विद्यार्थ्यांना वर्गात दिला जातो प्रवेश.

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतर्गत शालेय शिक्षण कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्यामुळे शिक्षकांनी शाळाच विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे अत्यंत दुर्गम भागातील व गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल व नेटवर्क सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे या उपक्रमाद्वारे शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.

यासंदर्भात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सपना म्हैसने व सचिव सचिन ढोणे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जवळपास आठशे विद्यार्थी शिक्षण घेत असून तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन अभ्यासासाठी पुरेशी साधने उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दारात शाळा भरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या उपक्रमाद्वारे सती, असोला, देऊळगाव, तांदळी, शिरला कोठारी, आगीखेड, खामखेड शेलगाव, बोरमळी, चेलका राजनखेड अशा अनेक ठिकाणावरील शेकडो विद्यार्थी या उपक्रमाद्वारे शिक्षण घेत आहेत.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये व ऑनलाइन -ऑफलाइन शिक्षणामध्ये समतोल टिकून राहावा यासाठी संस्थेचा हा प्रयत्न आहे विद्यालयातील जवळपास 70 टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असून 30 टक्के विद्यार्थी ऑफलाइन शिक्षण घेत आहेत.

शाळाच विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबवताना covid-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्या जाते. विद्यार्थ्यांची 5-5 चे गट करून वेळापत्रक ठरवून दिले आहे तर शासनाने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर चालू केलेल्या अभ्यासक्रमाच्या वेळा वगळून हे वेळापत्रक ठरवलं आहे.

अभ्यास वर्गाला विद्यार्थी आल्यानंतर विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, मास्क, स्यानीटाईज करूनच अभ्यास वर्गाला बसवलं जाते यासाठी शाळेतील शिक्षक बदली झाल्यागत खेड्यापाड्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत तर या उपक्रमाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित होत आहे पर्यायाने विद्यार्थ्यांचे अनलॉक लर्निंग होत असून विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आहेत.

शाळेने विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाची सोय केली आहे परंतु ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी आहेत जिथे नेटवर्क नाही स्मार्टफोन नाही असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेने शाळाच विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे व पालकांचे सुद्धा चांगले सहकार्य मिळत आहे

सौ. सपना म्हैसने

अध्यक्षा सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातुर

सावित्रीबाई फुले विद्यालयाने हाती घेतलेला शाळाच आपल्या दारी हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहत आहेत असेच ऑफलाइन विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद सह सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी covid-19 च्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रयत्न करावे.

अनिल अकाळ गटशिक्षणाधिकारी, पातुर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here