विदर्भातील “या” तीन जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता !…

न्यूज डेस्क – गेल्या आठवड्यापासून विदर्भात कोरोना झपाट्यानं वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांनी उपाययोजना हाती घेण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनही नियंत्रणासाठी पावलं उचलत असून, तीन जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे विदर्भातील या तीन जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला जाण्याची शक्यता आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत.

राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जात असतानाच करोनाचं संकट उभं राहताना दिसत आहे. मागील काही दिवसांत औरंगाबाद पुणे, अमरावती, अकोला वर्धा, यवतमाळ आणि नागपूर शहरात रुग्ण वाढत आहेत.

त्यामुळे यातील काही शहरांमध्ये संध्याकाळी सहा ते पहाटेपर्यंत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू आहे. राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत.

दरम्यान, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, रुग्णसंख्येतही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “त्या त्या जिल्ह्यतील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

मात्र, त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही, तर संचारबंदी लावण्याची वेळ येऊ शकते. सध्या विरोधक-सत्ताधारी असे सर्वच आंदोलन करीत आहेत. करोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वच पक्षांनी आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. नेत्यांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे,” असे वडेट्टीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here