मनसुख हिरेन हत्या प्रकरण | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी NIAचा छापा…

न्यूज डेस्क – मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी मुंबई एनआयए ने छापा टाकला आहे. आज सकाळी सहा वाजता दरम्यान एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या राहत्या घरी अंधेरीत हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून तपास सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरु असून प्रदीप शर्मांच्या घऱाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी अन्टेलिया घराजवळ स्कार्पियो SUV मध्ये जिलेटीन ठेवल्याच्या प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली.

निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.

शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्यांना एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जुने सहकारी सचिन वाझे यांना समोर आणून शर्मा यांच्याकडे एनआयएने चौकशी केल्याची माहिती मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here