आर्यन खान ड्रग्जप्रकरणात नवीन ट्विस्ट?…मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट…सुनील पाटील हा कुणाचा माणूस?…

फोटो- video स्क्रीन शॉट

न्यूज डेस्क – आर्यन खान ड्रग्स प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत, आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा पंटर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंडच सुनील पाटील आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाची वेगळी बाजू मांडून एकच खळबळ उडवून दिली. माझ्या माणसाची एनसीबीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या असं पाटीलने सॅम डिसूजाला सांगितलं होतं. पाटील यांचा हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून किरण गोसावी होता. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं, असा गौप्यस्फोट कंबोज यांनी केला.

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे, असंही त्यांनी सांगितलं..

सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचं राज्यभरात बदल्यांचं रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात. पाटील यांचे गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे? असा सवाल त्यांनी केला.

सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही. सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं, असा दावाही त्यांनी केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here