NEET Exam | ‘या’ तारखेला होणार नीटची परीक्षा…केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा…

फाईल फोटो

न्यूज डेस्क – देशात कोरोना काळात या वर्षी अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या होता तर आता दुसरी लाट ओसरत असताना राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) १२ सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशात घेतली जाणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षांबाबत विद्यार्थी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत विचारत होते. अखेर त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी अर्ज उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून ntaneet.nic.in वर उपलब्ध असणार आहे.

यापूर्वी ही परीक्षा १ ऑगस्ट रोजी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षाही करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणसाठी ही परीक्षा पास होणं महत्त्वाचं आहे. नीटसाठी अर्ज मिळताच नवीन परीक्षेचा पॅटर्नही जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक विभागात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढेल. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न निवड करता येतील. माहिती पत्रक आल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या परीक्षेला किमान १४ लाख विद्यार्थी बसतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत होते.

गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here