न्यूज डेस्क – राज्यातील महाविकास आघाडीचे दोन मंत्री सध्या वादाच्या भोवर्यात सापडले असल्याने विरोधक चांगलेच यावर तोंडसुख घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली. तसंच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यामुळे अटक केली आहे.
या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ‘आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही.
धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, हे भाजपचं काम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील,’ असं जयंत पाटील म्हणाले.
‘नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही, पण सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी निपक्ष चौकशी करावी. जावयाने काय केलं, त्याचं खापर सासऱ्यावर का फोडता?’ असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकार दबावाचं राजकारण करत आहे, हे जगजाहीर आहे. देशाच्या जनतेला हे सगळं कळत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसंच पंकजा मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्नावर मात्र त्यांनी मला माहिती नाही, असं उत्तर दिलं.