नांदेड – महेंद्र गायकवाड
संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या कर्तव्याचा, परंपरेचा व राष्ट्रनिष्ठेचा जागतिक गौरव व्हावा या उदात्त हेतूने ९ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने आणि विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो.
अशा महत्वपूर्ण दिनी हर्षोल्हासात कुटुंबासोबत शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांना हा दिवस साजरा करता येत नसल्याने या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करून रिक्त पदावर अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी व देशातील आदिवासी समाजाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे,
आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून यासाठी आपण खासदार या नात्याने प्रयत्न करावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार,खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे विधानसभेचे उपसभापती आ. नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य समन्वयक जयवंत वानोळे,
आदिवासी समाज शिष्टमंडळाचे समन्वयक गंगाधर वानोळे यांनी नवी दिल्ली येथे दि.८ रोजी भेट घेऊन केली. यावेळी यचंद्र सयाम,गंगाराम जांभेकर, विजय घोडे, सुरज आत्राम, राहुल युवनाते, रामदास राठोड उपस्थित होते.