नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांनी उपाययोजना करूनच आवश्यक ती खबरदारी घ्यावी-शिक्षण सभापती संजय बेळगे…

नांदेड – महेंद्र गायकवाड

सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील नववी ते बारावी चे वर्ग असलेल्या 858 शाळा सुरू करण्यात येणार असून covid-19 च्या संदर्भाने शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. हात धुणे ,मास्क लावणे, शाळेचे निर्जंतुकीकरण आदी सर्व उपाययोजना करून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले आहे.

जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा आज दुपारी शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. सभेस समितीचे ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर, लक्ष्मण ठक्करवाड ,साहेबराव धनगे, संध्याताई धोंडगे ,अनुराधा पाटील यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर यांनी शाळा सुरु होण्याआधी व सुरू झाल्यानंतर अवलंबिण्याची कार्यपद्धती याबाबत करावयाचे संपूर्ण नियोजन सभागृहास सादर केले.

23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार असल्यामुळे त्यापूर्वी शाळापूर्व तयारी करून घ्यावी. हात धुण्यासाठी पाणी व साबण याची व्यवस्था ,शाळेची स्वच्छता ,निर्जंतुकीकरण करून घ्यावे, सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शाळा भेटी करून पाहणी करावी व अहवाल सादर करावा.आणि 23 नोव्हेंबरला शाळा सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थित सुरू होतील या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सभापतींनी सूचना केल्या .

आदर्श शाळा ,शाळा दुरुस्ती अनुदान, शिक्षक निवडश्रेणी ,संचमान्यता, बदल्या, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, शाळा पूर्वतयारी व शाळा सुरू झाल्यानंतर करावयाची कार्यवाही आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. समिती सदस्यांसह उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here