नगरधन – कांद्री (कन्हान) रस्त्याची लागली वाट…रस्त्यात जागोजागी खड्डे देताहेत अपघातास आमंत्रण…

निधी मंजुर पण बांधकामाचा थांगपत्ता नाही…सरपंच कामडींनी दिला आंदोलनाचा इशारा

राजु कापसे
रामटेक

रामटेक तालुक्यातील नगरधन गावापासुन गेलेला नगरधन ते कांद्री ( कन्हान ) मार्गाची मोठी दुरावस्था झालेली असुन रस्ता जागोजागी उखडलेला आहे. रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळेनासे होते. त्यामुळे या मार्गावरून रहदारी करतांना परिसरातील नागरीकांची तारेवरचीच कसरत होत असते व भरीस भर म्हणजे विशेषतः दुचाकीसारखी वाहाने घसरून अपघात होण्याची शक्यता राहाते.

या समस्येबाबद नगरधन ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत कामडी यांनी तिव्र नाराजी व्यक्त करीत सदर रस्त्याच्या बांधकामाची मागणी रेटुन धरली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरधन ते कांद्री (कन्हान) हा १४ किमी अंतराचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून अनेक वर्षापासून उखडलेल्या अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे व गिट्टीच दिसून येते. त्यामुळे या रस्त्यावरुन रहदारी करतांना मोठी पंचाईत होत असते.

विशेष म्हणजे रामटेक हे राममंदिर, पर्यटन क्षेत्र तसेच नगरधन येथील पुरातनकालीन किल्ला यासर्व बाबींमुळे दुरवर ख्यातनाम आहे तेव्हा या भागात दररोज शेकडो लोक हजेरी लावत असतात. कांद्री ( कन्हान ) कडुन नगरधन कडे यायचे असल्यास हा मार्ग म्हणजे एक ” शार्टकट ” मार्ग ठरत असतो. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे पर्यटकांना फेरा मारुन मनसर मार्गे जाणे येणे करावे लागते. तर रामटेक परिसरातील नागरिकांना कामठी किंवा नागपूर येथे शासकीय कामे किंवा आरोग्य तपासणी व उपचारासाठी हाच मार्ग अंत्यंत सोयीचा आहे. पण पर्याय नसल्यामुळे नागरिकांना १४ किलोमीटर ऐवजी ३० किमी लांबच्या मार्गाने उशिरा पोहोचावे लागते. परिणामी हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे व इंधन दरवाढ खूप वाढल्याने पर्यटकांची रहदारी सुध्दा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्याचे ताबडतोब बांधकाम सुरू करावे अन्यथा जर पावसाळ्यापुर्वी या रस्त्याचे बांधकाम झाले नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरधनचे सरपंच प्रशांत देविदास कामडी यासह नागरिकांनी दिला आहे.

नागरिकांचा लोकप्रतिनिधींवर रोष
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी अनेकदा संबंधित विभाग, आमदार व खासदार यांच्याकडे मागणी लावून धरली पण आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. तर फक्त दररोज अपघात हेच नागरिकांना नशिबात मिळत असल्याचे मत नागरिक व्यक्त करित आहेत. आमदार व खासदार करतात तरी काय ? फक्त भुमीपुजन हे त्यांचे कर्तव्य आहे काय ? असाही सवाल नागरिक करीत आहेत. संबंधीत विभागात गेले असता अधिकारी उपस्थित राहत नाही तर कधी मिळालेच तर हा रस्ता बांधकामासाठी वर्ष भरापासून ३०० करोड रुपये मंजूर असल्याचे सांगितले जाते मात्र कामाचा सुभारंभ कधी होणार याची प्रतिक्षा नागरिक करीत आहेत. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षषणामुळेच हे हाल नागरिकांना भोगावे लागत आहेत असे नागरिक आरोप करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here