ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ…

मनोर ग्रामपंचायत कार्यालयात पालघर पंचायत समितीच्या सभापतींच्या हस्ते शुभारंभ.

मनोर – पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला रविवारी (ता.20) मनोर मध्ये सुरुवात करण्यात आली.मनोर ग्रामपंचायत सभागृहात पालघर पंचायत समितीच्या सभापती रंजना म्हसकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने मनोर आणि लगतच्या परिसरात लागण झालेल्या रुग्णांची संख्या 190 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी करून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील कुटुंबाची तपासणी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे.

दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील लोकसंख्या 50 हजार 562 इतकी आहे.या मोहिमेत घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे शारीरिक तापमान,ऑक्सिजन पातळी आदी तपासण्या करून संशयित रुग्णांचा शोध घेतला जाईल.यासाठी चौदा पथके तयार करण्यात आली आहेत.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे.जनजागृती मास्कचा वापर,सामाजिक अंतर आणि हाताची स्वच्छता या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कोरोना विषाणूचा फैलाव रोखता येऊ शकतो.असे मत यावेळी पंचायत समितीच्या सभापती रंजना म्हसकर यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विष्णू कडव,मनोरच्या सरपंच पौर्णिमा दातेला, उपसरपंच कैफ रईस, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सुर्यवंशी,गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप,तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिजित खंदारे, डॉ तन्वीर शेख, डॉ पंढरी बोडके, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here