मुंबई | २१ कोटी रुपये किमतीचे सात किलो युरेनियम केले जप्त…दहशतवादीविरोधी पथकाची कारवाई…

न्यूज डेस्क – मुंबईतील नागपाडा भागातून महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली असून त्या दोघांकडून तब्बल सात किलो युरोनियम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २१ कोटी रुपये इतकी आहे. युरेनियम हा दुर्मिळ धातूंपैकी एक आहे. किरणोत्सर्ग करणाऱ्या या धातूचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी केला जातो.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या युरेनियम बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नागपाडा येथून दोन जणांना अटक केलीय. या दोघांकडे ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम आढळून आलं आहे. या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. अणु ऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक संतोष भालेकर यांना एक व्यक्ती युरेनियमचे तुकडे विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या व्यक्तीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव जिगर पंड्या असं आहे. जिगरकडे चौकशी केली असता त्याला त्याचा मित्र अबु ताहिर याने हे युरेनियमचे तुकडे पुरवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

युरेनियम खरेदी करणाऱ्यासाठी कोणी तयार होत आहे का याचा शोध दोन्ही आरोपी घेत असतानाच एटीएसने त्यांच्यावर छापा टाकून हे युरेनियम जप्त केला आहे.

दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here