अधिक कार्यक्षम बनून १०० टक्के वसुली करा; वसुलीत हयगय करणाऱ्यांवर कारवाई करा; महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी…

अमरावती – मोठ्या प्रमाणात थकबाकी साचल्यामुळे महावितरणची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. महावितरणने ग्राहकांना १० महिने अखंडित वीज दिली. त्यांना वसुलीसाठी ना तगादा लावला, ना वीज पुरवठा खंडित केला ही वस्तुस्थिती ग्राहकांना समजावून सांगा आणि अधिक कार्यक्षम बनून १०० टक्के वसुली करा,

वसुली करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, असे निर्देश महावितरणच्या नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले. तसेच यात हयगय करणाऱ्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुहास रंगारी यांनी सर्व परिमंडळाचा सविस्तर आढावा घेतला.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्वच वर्गवारीतील थकबाकी १०० टक्के वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १०० टक्के वसुलीसाठी नागपूर प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता दौरे काढावे,मेळावे आयोजित करावे,

ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहित करावे,महाकृषी ऊर्जा धोरणाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवावी तसेच या धोरणांतर्गत जास्तीत जास्त  शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी व भरघोस सवलतीची माहिती देऊन त्यांना थकबाकी मुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे यासह वीज वितरण हानी कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना करावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.

मागील १० महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड साचले आहे.अशा स्थितीत वीज बिल माफ होणार नाही. तसेच अशीच परिस्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या गंभीर परिस्थितीची जाणीव ग्राहकांना करून द्या व १०० टक्के वीज बिल वसुली करा तसेच शासकीय कार्यालयातील थकबाकीचीही वसुली करा,

असे निर्देश सुहास रंगारी यांना दिले. या बैठकीत अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता (प्रभारी) दिलीप खानंदे,अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर,चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार,उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे सर्व परिमंडलाचे अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here