Mahavitaran | खबरदारी – बाहेर धोका वाढलाय! महावितरणची ऑनलाईन वीजबिल भरण्याची सोय…

बिल भरल्याची पोच तत्काळ नोंदणीकृत मोबाईलवर…

अमरावती – सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. वीज ग्राहकांनी धोका पत्कारत वीजबिल भरण्याच्या रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ‘ऑनलाईन’ सोयीद्वारे घरबसल्या वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्याकडून करण्यात आले आहे.           

महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल एप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहून धोका पत्कारण्यापेक्षा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे.                    

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच जून २०१६ पासून मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात  तासंनतास रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती द्यावी.           

लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे.

याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतू क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.  

‘ऑनलाईन’द्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’ द्वारे पोच देण्यात येत आहे. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपवर मागील वर्षभराच्या महिन्यांतील बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती उपलब्ध आहे.

यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.    

वेळेत वीजबिल भरणे महावितरणसाठी आणि ग्राहकांसाठीही सोयीचे :-गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या कठिण काळात महावितरणने  केवळ वीज पुरवठ्यालाच प्राधान्य दिले.जुन- जुलैमध्ये  मीटर रीडिंगनंतर सर्व सवलतींचा लाभ देऊन अचूक वीजबिले ग्राहकांना देण्यात आली.

परंतू एकत्रित तीन चार महिन्याचे वीजबिल ग्राहकांना अवाजवी किंवा जास्त वाटू लागल्याने वीज वापरानुसार अचूक वीजबिले देऊनही ग्राहकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला. परिणामी लॉकडाऊन कालावधी सुसह्य करण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या महावितरणला आर्थिक तर कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागला. 

अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज :- परिमंडलातील गेल्या वर्षभरात २५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे, तर तीघांनी या जगाचा निरोप घेतला आहे.अशा परिस्थितीतही महावितरण अखंडित वीज सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

पण,ग्राहकांनीही महावितरणची जीवनवाहीनी असलेली वीजबिलाची रक्कम नियमित आणि वेळेत भरून करने महावितरणच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. तसेच कोरोनाविरूध्द असलेल्या या लढाईला जिंकण्यासाठी वेळोवेळी शासनाकडून निर्गमीत केलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही  मुख्य अभियंता यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here