न्यूज डेस्क – कॉंग्रेस चे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज पुन्हा टीकास्त्र सोडल, मोदीं केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यात हित मानतात. परंतु, आता त्यांनी सर्वांसमोर येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आली आहे. खाली टनल मध्ये एकटे असताना हात हलवण्यापेक्षा मोदींनी मौन सोडलं पाहिजे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला. यामध्ये राहुल यांनी कोरोनासंदर्भात सरकारकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव, देशातील लघूमध्यम उद्योगांची दुरावस्था आणि हाथरस प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि जनतेला खूप मोठा फटका बसले, हे मी फेब्रुवारी महिन्यातच सांगितले होते. मात्र, त्यावेळी नरेंद्र मोदी २२ दिवसांत आपण कोरोनाची लढाई जिंकू, असे सांगत होते. यावरुन कोणाला किती समज आहे, हे तुम्ही ठरवा, असे राहुल यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लघूमध्यम उद्योग संपवले. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वत:च्या उद्योगपती मित्रांना मदत केली. तर स्वत:च्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून मोदींनी भारताचा १२०० स्क्वेअर मीटरचा भूभागही चीनला देऊन टाकला. उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणानंतरही संपूर्ण व्यवस्था पीडितेच्या कुटुंबावर आक्रमण करते आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
या सगळ्या कारणांमुळे नरेंद्र मोदी कधीही जाहिररित्या पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. आपल्याला उत्तरे द्यावी लागतील या एकाच कारणामुळे ते चीन आणि प्रसारमाध्यमांना घाबरतात. मोदींना केवळ आपली प्रतिमा जपण्यातच रस असल्याचेही राहुल त्यांनी म्हटले.
यापूर्वी काल पटियाला येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले होते. या कायद्यांमुळे शेतीची प्रचलित व्यवस्था मोडीत निघेल. शेतकरी कॉर्पोरेट उद्योगांच्या दावणीला बांधले जातील, असा इशारा राहुल यांनी दिला होता.