चंद्रपूर | आमदारांनी स्वतः अवैध दारूच्या सात गाड्या पकडुनही गृहमंत्र्यांना हवी स्पेसिफिक केस…

राकेश दुर्गे,चंद्रपूर

स्थानिक अपक्ष आमदारांनी चंद्रपुरात सात गाड्या अवैध दारू पकडून दिल्यानंतरही राज्याच्या गृहमंत्र्यांना अवैध दारु तस्करीची ‘स्पेसिफिक केस’ हवी आहे. चंद्रपुरात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विविध कार्यक्रमात आपली हजेरी लावली.

रात्री 9 वाजता त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बातचित करताना त्यांना सहाजिकच दोन दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांनी सात अवैध दारूच्या गाड्या पकडल्याचे लक्षात आणून दिले. ही कारवाई करताना पोलिस अधिकाऱ्यांनी आमदारांशी उर्मट संवाद केल्याचेही सांगितले.

त्यावर बोलताना गृहमंत्र्यांनी ‘स्पेसिफिक केस’ द्या, असे पत्रकारांना सांगितले व आमदार जोरगेवार यांची लेखी तक्रार मिळाल्याचेही कबूल केले. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. या पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी सरकार किती संवेदनशील आहे, हे या विधानाने दिसून आले आहे.

कालच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी आमदारांशी उर्मट संवाद केलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधिकारी शिरजोर तर लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे चंद्रपूरच्या घटनेने सिद्ध केले आहे.

बाईट : अनिल देशमुख, गृहमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here