बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीची आमदारांकडून पाहणी…

नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन.

मनोर – पालघर तालुक्यातील बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीची पाहणी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्याकडून करण्यात आली.शुक्रवारी (ता.18) केलेल्या पाहणी वेळी जिल्हा परिषद सदस्या भावना विचारे,ग्रामपंचायत सदस्य राजू जाधव,मिलिंद साखरे, रुपेश पाटील,गणेश काळे,भगेश घरत,चेतन संखे आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल जून महिन्यात दिला होता.दररोज शंभर ते दीडशे रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येत असतात.

या रुग्णांवर धोकादायक इमारतीत रुग्णांवर उपचार केले जात आहेत.इमारत कोसळून अपघात झाल्यास जिवीतहानीची शक्यता असून बोईसर परिसरातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढून रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे बोईसर परिसरातील वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या पाहता ग्रामीण रुग्णालयाची धोकादायक इमारत पाडून तातडीने नवीन इमारतीचे बांधकाम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बोईसर परिसरातील नागरिक सुसज्ज रुग्णालयाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून यापुढेही पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी वनखात्याची अडीच एकर जमीन सार्वजनिक बांधकाम खात्यात वर्ग करण्यात आली आहे. बोईसरच्या चित्रालय भागातील रामदेव हॉटेल समोरच्या सर्वे नंबर 108 अ/30 पैकी अडीच एकर जमीन सुपूर्त करून निधीही वितरित केल्याचे पत्र 1 डिसेंबर 2018 ला जिल्हा शल्यचिकित्सकांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात दिले होते.

परंतु अणु ऊर्जा विभाग आणि एन सी पी आय एल ने या जागेसाठी न्यायालयात दावा(14/2018) दाखल करून स्थगिती मिळविल्याने रुग्णालयाचे काम रखडले आहे.औद्योगिकीकरणामुळे बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहतींचे जाळे निर्माण झाले असून लोकसंख्येत वाढ झाली आहे.बोईसर परिसरात सर्व सोयीसुविधा युक्त शासकीय रुग्णालय नसल्यामुळे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी गुजरात आणि केंद्र शासित प्रदेश सिल्वासा येथे जावे लागते.

बोईसर परिसरात कंत्राटी पध्दतीवर काम करणारे मजुर आणि बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे.खासगी उपचार परवडत नसल्याने ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आरोग्य सुविधांवर अवलंबून असणारा मोठा वर्ग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here