आमदार रवी राणा यांची आमदारकी धोक्यात?…न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आदेश…

न्यूज डेस्क – खासदार नवनीत राणा पाठोपाठ आता आमदार रवी राणा यांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे, रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत अपात्र ठरविण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिले. न्यायालयाने हे आदेश सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.

रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता रवी राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता निवडणूक आयोग त्यांना अपात्र ठवरण्याची कारवाई करणार आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी रवी राणा यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आमदार राणा यांना 8 ऑक्टोबर 2021 रोजी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10-ए अंतर्गत कारवाई सुरू करण्याबाबत नोटीस जारी करण्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. तसेच ही कारवाई सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, असेही निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर आयोगाची बाजू ऐकून घेतल्यानंतर राणा यांना अपात्र ठरविण्यासाठी सुरु करण्यात आलेली कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देऊन ही याचिका न्यायालयाने निकाली काढली

याआधी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने जून 2021 मध्ये रद्द केलं होतं. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला होता. नवनीत राणा यांना हायकोर्टानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला होता. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. कोर्टाच्या या निकालानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार करावा अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here