मिरज-मालगांव रस्ता रुंदीकरणासाठी सोमवारी रस्ता रोको आंदोलन मिरज शहर सुधार समितीचा इशारा – पूर्व भागासह शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार…

सांगली – ज्योती मोरे

मिरज-मालगांव हा शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील वाढलेली नागरी वस्ती, वाहनधारकांची संख्या आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलैल्या या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणासाठी मिरज शहर सुधार समिती सोमवार 18 ऑक्टोबर रोजी अमनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

मिरज पूर्व भागातील सुभाषनगर, मालगाव, टाकळी, बोलवाड, गुंडेवाडी, मल्लेवाडी, खंडेराजुरी, सलगरे, बेळंकी, पायाप्पाचीवाडी, कवठेमहांकाळ, सह कर्नाटकला जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. शिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूस कलावतीनगर, इंदिरानगर, पूर्व दत्त्त कॉलनी, पश्श्चिम दत्त्त कॉलनी, खोतनगर, महादेव कॉलनी, एकता कॉलनी, अमननगर, दर्गाह कॉलनी असे सुमारे 25 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले उपनगरे आहेत.

या रस्त्यावरील अनेक मालमत्त्ताधारकांनी नैसर्गिक नाला मुजवून अतिक्रमण करून घरे बांधले आहेत. अनेकांनी रस्त्यावरच वाळू, भंगार, लोखंड विक्रीचे डेपो (दुकाने) थाटली आहेत. रस्ता अरुंद झाल्याने दररोज अपघात घडत आहेत. याबाबत मिरज शहर सुधार समिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहे.

मात्र अधिकारी केवळ वेळ मारून नेत असल्याने समितीने रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनात सुभाषनगर, मालगांव, टाकळी, बोलवाड, गुंडेवाडी, खंडेराजुरी आदी ग्रामस्थांसह मिरज-मालगांव रोडवरील नागरीक सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे अ‍ॅड. ए. ए . काझी, अध्यक्ष शंकर परदेशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here