मेट्रो कारशेड आता कांजुरमार्ग येथे होणार…आरे हा जंगलाचा भाग…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील आरे कारशेडबाबत फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय रद्द करत आणखी एक दणका दिला आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचे घोषित करत, मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गमध्ये उभारण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे.उद्धव ठाकरे यांनी आरेमधील 800 एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे.

‘आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण, आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही’ असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले

तसंच, आरेमध्ये ज्या इमारती उभ्या केल्या आहे आणि जे काम झाले आहे, त्यावर 100 कोटी खर्च झाला आहे. हा खर्च वाया जाणार नाही. त्याचा दुसऱ्या कामासाठी वापर केला जाईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

त्याचबरोबर, ‘मेट्रो कारशेडला आम्ही विरोध केला होता. पर्यावरण प्रेमींनीही विरोध केला होता. मेट्रो कारशेड रद्द करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली होती. यात अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहे, ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहे, अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here