MPSC नंतर आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्याही परीक्षा पुढे ढकलल्या…

अमरावती – प्रणव हाडे

दहावी, बारावीचे SSC, HSC आणि MPSC परीक्षांनंतर आता राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

अमित देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं, “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या जूनमध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.”

या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली, असं देशमुख यांनी सांगितलं.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्य सरकारने 11 एप्रिल रोजी नियोजित असलेली MPSC परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर पुढे ढकलली होती. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, या मागणीने जोर धरला होता.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 19 एप्रिल ते 30 जूनदरम्यान या परीक्षा होणार होत्या.

MBBS, MD, MS, BDS आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढती रुग्णसंख्या पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून केली जात होती.

खासदार सुप्रिया सुळे, राजीव सातव यांच्यासह आमदार सतीश चव्हाण यांनीही याबाबत मागणी केली होती.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here