२० मार्चला संपूर्ण पृथ्वीवर ‘दिवस व रात्र समान’…

न्युज डेस्क – सूर्य हा २० मार्च रोजी बरोबर विषववृत्तावर पोहचत असल्याने या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र सारखेच राहील . या दिवसाला खगोल शास्त्रात विषुवदिन ( इकोनॉक्स ) असे म्हणतात. या दिवसाला वसंतसंपाद दिन असे सुद्धा म्हणतात . सरासरी हा दिवस दरवर्षाला २० मार्च ते २२ मार्च च्या दरम्यान असतो.

पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात दरवर्षाला थोडा फरक पडतो या दिवशी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव अगदी सूर्यासमोर असतात, यावेळी विषुववृत्तावर मध्यान्हीच्या वेळी सूर्याचे किरण लंबरूप पडतात. म्हणजेच मध्यान्हवेळी विषुववृत्तावर सूर्य बरोबर डोक्यावर असतो.

दिवस व रात्र नेहमीच लहान – मोठे असतात . दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होतात. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात अशा दिवशी संपूर्ण पृथ्वीवर दिवस – रात्र समान असतात, सर्व खगोल प्रेमींनी व जिज्ञासूंनी २० मार्च या दिवस व रात्रीच्या प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व या दिवस व रात्रीचे कालमापन करावे.

असे आवाहन मराठी विज्ञान परिषद , अमरावती विभागाचे हौशी खगोल अभ्यासक विजय म . गिरुळकर व प्रविण गुल्हाने यांनी केले आहे . या घटनेविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास मो.नं. ९ ६३७३८४८१२ वर संपर्क साधावा .