मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन…

गणेश तळेकर, मुंबई

मराठी चित्रपट दिग्दर्शिका,निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचे निधन झाले. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं मनोरंजनसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटीं सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

सुमित्रा भावे यांनी यांचे सामाजिक क्षेत्रात तेवढेच मोलाचे कार्य होते, एक पैशांचंही मानधन न घेता सामाजिक संस्थांसाठी कित्येक वर्ष काम केलं. असं हरहुन्नरी व्यक्तीमत्व गमावल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शोककळा पसरली आहे.

त्यांनी एकूण सुमारे 14 चित्रपट, 50 हून अधिक लघुपट आणि चार मालिकांची निर्मिती केली. यामध्ये प्रामुख्यानं ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट विशेष गाजले. या चित्रपटांसाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं.

सुमित्रा यांचा जन्म 12 जानेवारी 1943 साली पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याकाळी स्त्रियांना फारसं शिक्षण दिलं जात नव्हतं. परंतु सुमित्रा यांचे वडील पाश्चात्य विचारांनी प्रेरित होते. त्यामुळं त्यांना हवं ते शिकण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळवली.

त्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमित्रा यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये कुठलाही मोबदला न घेता काम केलं. हे काम सुरु असतानाच त्यांचं लक्ष सिनेसृष्टीच्या दिशेनं वळलं. चित्रपट माध्यमाची ताकत कळल्यानंतर त्यांनी दिग्दर्शिका म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here