मानाचा मुजरा कार्यक्रमाच्या खर्चासंबंधी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणार…

विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, मिलिंद अष्टेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती…

पुणे – गणेश तळेकर

‘मानाचा मुजरा ‘ या २०१५ मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वाढीव खर्चासंबंधी झालेल्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्टीकरण विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल,मिलिंद अष्टेकर या मराठी चित्रपट महामंडळाच्या तत्कालिन संचालक मंडळ सदस्यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

महामंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर, महामंडळाचे माजी कार्यवाह रणजीत जाधव, इम्तीयाझ बारगीर देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.अभिनेत्री अलका कुबल याही नंतर पत्रकार परिषदेत उपस्थित राहिल्या.

मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त ‘ मानाचा मुजरा ‘ हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे २०१५ मध्ये झाला होता. या कार्यक्रमात १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चाविरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दिली होती. विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल त्यावेळी संचालक होते. तक्रारीनंतर या खर्चाची भरपाई करण्याचा आदेश सहआयुक्तांनी जानेवारी २०१९ मध्ये दिला होता.

हा आदेशाची अधिकृत प्रत कलाकारांनी आज मिळवली. हा आदेश देण्यापूर्वी तत्कालिन महामंडळ संचालक मंडळाची बाजू ऐकण्याआधीच निर्णय दिला गेला. तो अन्यायकारक असून त्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, मिलिंद अष्टेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

हॉटेल तरवडे क्लार्क इन येथे ही पत्रकार परिषद झाली.’ ही तक्रार म्हणजे कलाकारांच्या बदनामीचा प्रयत्न आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आमचे म्हणणे ही ऐकून घेतले नाही. ‘ असे या कलाकारांनी सांगीतले. महामंडळाचे माजी कार्यवाह रणजीत जाधव म्हणाले, ‘ या बदनामीच्या मागे मेघराज भोसले आहेत. ‘

या कलाकारांचे वकील अॅड. सत्यजित लोणकर म्हणाले, ‘ धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरुध्द न्यायालयात आव्हान देणार आहे.’मानाचा मुजरा ‘ हा कार्यक्रम २०१५ मध्ये झाला. त्यात वाढीव खर्च झाला, अपहार झाला, अशी तक्रार जाधव आणि अन्य सदस्यांनी केली होती.

हे तक्रारदार जाधव देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. त्यांनी ही स्पष्टीकरण देऊन प्रिया बेर्डे, कुबल, पाटकर यांची बाजू घेतली. ” तक्रार देण्याच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वापर करण्याचा प्रयत्न झाला. ‘ असे जाधव यांनी सांगीतले.

विजय पाटकर म्हणाले, ‘महामंडळाच्या दोन सर्वसाधारण सभा मध्ये या वाढीव खर्चाला मान्यता दिली गेली आहे. तो अपहार नाही. महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आकस, आणि राजकारणासाठी हे आरोप करीत आहेत. त्यांनी राजकारण अन्यत्र करावेत. चांगल्या लोकांनी काम करण्यासाठी महामंडळ ही जागा आहे.

प्रिया बेर्डे म्हणाल्या, ‘ बदनामीचे घाणेरडे राजकारण सुरू आहे.आम्हाला कलाकारांसाठी काम करायचे आहे. मराठी प्रेक्षक हे कलाकारांना घरातील सदस्य मानतात. पण, अशी बदनामी चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत कधी झाली नाही.कोणीही आमची बाजू ऐकण्याचा प्रयत्न केला नाही, हे जास्त दुर्दैवी आहे.महामंडळात आकसाचे राजकारण सुरू आहे, असे विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगीतले.

विद्यमान महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या मनमानी कारभारावर या कलाकारांनी टीका केली. महामंडळाच्या आगामी निवडणुकीत त्यांना जाब विचारू. काही कलाकारांना धमक्यांचे फोन येतात, अशा गोष्टी ऐकल्या की छाती दडपते, असेही विजय पाटकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here